Mohammad Nadeem Record : मोहम्मद नदीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी२० विश्वचषकात हा खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Mohammad Nadeem record : वयाच्या ४३ व्या वर्षी आयसीसी (ICC) स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

Mohammad Nadeem record in SL vs OMA match : यजमान श्रीलंकेने टी-२० विश्वचषकात आपल्या विजयाचा सिलसिला कायम राखला आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने सर्वच विभागांत सरस कामगिरी करत १०५ धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्याची खरी चर्चा ठरली ती ओमानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नदीम याने मोडलेल्या ३० वर्षांपूर्वीच्या विक्रमाची.
शनाकाचा तडाखा आणि श्रीलंकेचा डोंगराएवढा स्कोअर –
नाणेफेक हरल्यावर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. श्रीलंकेने २० षटकांत २२५ धावांचा धाकधूक वाढवणारा स्कोअर उभा केला. कर्णधार दासुन शनाकाने वादळी फलंदाजी करत अवघ्या १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने श्रीलंकेसाठी टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक धावा करण्याचा मान पटकावला आहे. कुसल मेंडिस, पवन रत्नायके आणि शनाका या तिघांच्या अर्धशतकांमुळे ओमानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला.
नदीमचा ‘ओल्ड इज गोल्ड’ परफॉर्मन्स –
ओमानचा पराभव निश्चित दिसत असतानाही ४३ वर्षांच्या मोहम्मद नदीमने एकाकी झुंज दिली. ५२ चेंडूंत ५३ धावांची खेळी करत त्याने दोन महत्त्वाच्या विक्रमांची नोंद केली.
१. वयाचा विक्रम: वयाच्या ४३ व्या वर्षी आयसीसी (ICC) स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने १९९६ मधील फ्लेव्हियन अपोंसोचा (43 वर्षे आणि 121 दिवस) विक्रम मोडला.
२. संथ अर्धशतक: त्याचे हे अर्धशतक टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतकांपैकी एक ठरले (मोहम्मद रिझवानच्या विक्रमाशी बरोबरी).
श्रीलंकेचा सुपर-८ मधील प्रवेश निश्चित?
ओमानचा संघ ९ बाद १२० धावांपर्यंतच मर्यादित राहिल्याने श्रीलंकेला मोठा विजय मिळाला. सलग दोन विजयांमुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास वाढला असून गट ‘ब’ मधून सुपर-८ मध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी आता केवळ औपचारिक उरले आहे.






