Mohali Cricketer Attack : मोहालीत सरावादरम्यान २२ वर्षीय क्रिकेटपटूवर तलवारीने जीवघेणा हल्ला; चेंडू स्विमिंग पूलमध्ये गेल्याने वाद
Mohali Cricketer Attack : मोहालीतील खरार येथे राहणाऱ्या २२ वर्षीय क्रिकेटपटू सात्विक अमनवर तलवारीने हल्ला झाला. सात्विक मूळचा बिहारमधील औरंगाबादचा आहे.

Mohali Cricketer Satwik Aman Attacked With Sword Over Ball In Swimming Pool : पंजाबमधील मोहाली शहरातून क्रीडाविश्वाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरावादरम्यान क्रिकेटचा चेंडू जवळच्या स्विमिंग पूलमध्ये गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुण क्रिकेटपटू सात्विक अमन याच्यावर तलवारीने (कृपाण) प्राणघातक हल्ला करण्यात आला. मूळचा बिहारच्या औरंगाबादचा असलेला सात्विक मोहालीतील सेक्टर ७४-ए मधील ओम साई क्रिकेट ॲकॅडमीमध्ये सराव करत असताना ही घटना घडली. या हल्ल्यात सात्विक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेंडू परत मागितल्याने वाद; पूल मालकाने हातात घेतली तलवार
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सरावाच्या वेळी फलंदाजाने मारलेला चेंडू सीमारेषा ओलांडून शेजारील स्विमिंग पूलमध्ये पडला. सात्विक जेव्हा चेंडू आणण्यासाठी गेला, तेव्हा स्विमिंग पूलचे गेट बंद होते. आवाज दिल्यानंतर पूलचा मालक बाहेर आला आणि त्याने थेट सात्विकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सात्विकने चेंडू परत मागितला असता, मालकाने आधी त्याच्या कपाळावर जोरदार ठोसा मारला. त्यानंतर संतापलेला आरोपी आत गेला आणि थेट धारदार तलवार (कृपाण) घेऊन बाहेर आला.
बचावाचा प्रयत्न करताना हातावर वार; पाठीवरही केला हल्ला
आरोपी जसबीर सिंग तलवारीने वार करण्यासाठी धावून आला असता, सात्विकने स्वसंरक्षणासाठी जवळ पडलेली बांबूची काठी उचलली. मात्र आरोपीने थेट त्याच्या डोक्यावर वार केला. सात्विकने स्वतःचा बचाव करण्यासाठी डावा हात पुढे केला असता तलवार हातावर बसून हात गंभीररीत्या कापला गेला. त्यानंतर सात्विक तिथून पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्याच्या पाठीवरही पाठीमागून वार केले आणि जीवे मारण्याची उघड धमकी दिली.
आरोपी जसबीर सिंगविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णालयात उपचार
हल्ल्यानंतर सात्विकने तात्काळ आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. त्याला तातडीने मोहालीच्या फेज-४ येथील चीमा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सात्विकने पोलिसांत धाव घेतली. मोहाली पोलिसांनी बलियाली गावातील रहिवासी असलेल्या जसबीर सिंगविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.





