डोंबिवली – स्वातंत्र्यावर गदा येणाऱ्या वृत्तीचा पराभव करणे आवश्यक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवर आघात करत असून त्यांची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चालू असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कल्याणमध्ये केले. भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरू आणि गांधी घराण्याने देशासाठी दिलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही. जगाला भारताची ताकद दाखवून देणाऱ्या इंदिरा गांधींची हत्या झाली, देशात आधुनिकीकरणाची सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांची हत्या झाली. गांधी नेहरू कुटुंबाचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान, कर्तुत्व मान्य करून त्याचा सन्मान करण्याऐवजी राहुल गांधी आणि त्यांच्याकडून काढल्या गेलेल्या पदयात्रेची नरेंद्र मोदींकडून टिंगलटवाळी होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. संजय राऊत, अनिल देशमुख, झारखंड मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली म्हणून मोदी सरकारने त्यांना जेलमध्ये टाकले. यावरून त्यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे, अशा शब्दांत पवार यांनी या राजकीय नेत्यांच्या अटकेचा समाचार घेतला.