नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याचवेळी देशात करोनाची काही ठिकाणी दुसरी तर कुठं तिसरी लाट आलेली आहे. मात्र राजकीय पक्षांकडून करोनाकडे सपशेल दुर्लक्ष करून लाखोंच्या सभांचा सपाटा सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच आतापर्यंत २३ भव्यदिव्य सभा पार पडल्या आहेत. त्यामुळे देशात खरचं करोना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील पाच विधानसभांच्या निवडणुकांत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तब्बल 23 सभा घेतल्या आहेत. मोदींच्या प्रचाराचा फोकस प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि आसामवर आहे. बंगाल, आसामबरोबरच केरळ, तामीळनाडू या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्या सर्वच ठिकाणी मोदींच्या प्रचार सभा झाल्या आहेत. गुरूवार ते शनिवार या 3 दिवसांत त्यांनी 10 सभा घेतल्या. बंगाल वगळता इतर विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाची प्रक्रिया 6 एप्रिलला समाप्त होणार आहे. त्यानंतर बंगालमध्ये 5 टप्पे उरतील. आसामची सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला सत्तेवरून हटवण्याचा निर्धार त्या पक्षाने केला आहे. त्यामुळे मोदींनी त्या दोन राज्यांमधील प्रचारावर अधिक भर दिल्याचे मानले जात आहे.