“मोदी, शाहांनी परवानगी दिल्यास युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार”; कर्नाटक मंत्र्याचा आक्रमक पवित्रा

Pahalgam Terror Attack | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी स्वत: सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयारी दर्शवली आहे.
शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत खान बीझेड जमीर अहमद खान म्हणाले की, “आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिलेला आहे. जर मोदी, अमित शाह आणि केंद्र सरकारने परवानगी दिली तर मी युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे,” असे खान म्हणाले.
#WATCH | Karnataka Minister BZ Zameer Ahmed Khan says, “…We are Indians, we are Hindustanis. Pakistan never had any relations with us. Pakistan has always been our enemy…If Modi, Amit Shah and the Central government let me, I am ready to go to battle. (02.05.2025) pic.twitter.com/HdYiZcYBIC
— ANI (@ANI) May 3, 2025
तसेच त्यांनी पीएम मोदी आणि अमित शाह यांच्याकडे त्यांना आत्मघातकी बॉम्ब देण्याची विनंती केली आहे. “मी युद्धासाठी पाकिस्तानात जाईन. मोदी, शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्ब द्या, तो मी माझ्या शरीरावर बांधेन आणि पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करेन,” असे मंत्री खान म्हणाले.
याआधी खान यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला निष्पाप नागरिकांविरोधातील घृणास्पद आणि अमानवी कृत्य आहे. प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवली पाहिजे. केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे आवाहन खान यांनी केले.
भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरुद्ध विशेष मोहीम आखली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात भारतीय सुरक्षा दलाचे पथक जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन राबवत आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईचे ठिकाण, वेळ आणि पद्धत सैन्य ठरवेल, असे पंतप्रधान मोदींनी देखील बैठकीत स्पष्ट सांगितले आहे.
हेही वाचा:
तेजस्वी यादवांचे पंतप्रधान मोदींना पत्र : जातीय जनगणनेवरून केली ‘ही’ मोठी मागणी





