Shiv Sena Protest Shikrapur | पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळल्याबद्दल केंद्राला साडी-बांगडीचा आहेर ; शिक्रापूरमध्ये शिवसेनेचा अनोखा निषेध

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) शिरूर तालुक्याच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान कार्यालयाला साडी, बांगडी आणि कुंकवाचा आहेर पाठवण्यात आला.तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम पोतले, उपतालुकाप्रमुख कौस्तुभ होळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शिवसेनेच्या या कृतीतून केंद्र सरकारची पाकिस्तानविरोधातील मवाळ भूमिका आणि देशाच्या भावनांचा अनादर केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोपटराव शेलार यांनी सर्वांचे आभार मानून या आंदोलनाची सांगता केली.




