‘मोदी काशीतून जीव वाचवून निघाले’ – राहुल गांधी

रायबरेली – अयोध्येतील रामलल्लाहचे मंदीर आपणच बांगले, असा प्रचार मोदी सरकारने केला. परंतू या मंदीराच्या उद्घाटनाला एकही गरीब माणूस नव्हता. तसेच, तुम्ही इथे येऊ शकत नाही, असे त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींनाही सांगितले. त्याचमुळे जनतेने मतपेटीतून उत्तर देत केवळ अयोध्येतच नाही तर वाराणसीतही पंतप्रधानांना शिकविला ज्यामुळे तिथून त्यांना जीव वाचवून पळावे लागले, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राहुल आणि प्रियांका गांधी जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच रायबरेलीला पोहोचल्यानंतर त्यांचे जनतेकडून मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. राहुल यावेळी पुढे म्हणाले, प्रियंका यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस एकजुटीने लढली, समाजवादी पक्षाचे आभार, त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या कार्यकर्त्यांसोबत एकत्र लढला.
इंडिया आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता एकत्र उभा राहून लढत असल्याचे मी प्रथमच पाहिले. यापूर्वी येथे मदत होत नसल्याच्या तक्रारी होत्या, मात्र यावेळी आघाडीचे सहकारी एक इंचही मागे हटले नाहीत. मोदी शहांना राज्यघटना संपवायची आहे, हे देशाच्या आत्म्याला समजले.
राहुल पुढे म्हणाले, मोदी-शहा देशाच्या पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देश एकसंध झाला. यंदा इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान हिंसेचे राजकारण करत आहेत. परंतू, उत्तर प्रदेशातील जनतेने द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात मतदान केले आहे. लोकांमध्ये द्वेष पसरवायचा आणि तीन उद्योगपतींना लाभ द्यायचा हेच या सरकारचे ध्येय आहे, असेही राहुल म्हणाले.
मोदींना जनतेने संदेश दिला
आमचे नेते आणि कार्यकर्ते अहंकाराला बळी पडणार नाहीत. आमच्या नात्याची सुरुवात 100 वर्षांपूर्वी इथल्या मातीत झाली. अमेठीमध्ये किशोरी शर्मा जी विजयी झाले आहेत, रायबरेलीमध्ये मी जिंकलो आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया अलायन्सचा विजय झाला आहे. तर मोदींना संविधानास हात लावल्यास काय होते याचा मोठा संदेश मिळाला, असेही ते म्हणाले.
जनतेचे खूप-खूप आभार
यावेळी बोलताना प्रियांका म्हणाल्या, राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार आहेत. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्व कठीण परिस्थितीत लढलात. किशोरीलाल यांना वंचित वाटू दिले नाही. समाजवादी पक्षाच्या व्यासपीठावर बसलेले सहकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही सेना तयार केली आणि दोन्ही जिल्हे जिंकले. संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे.





