मोदी म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार; मध्यप्रदेशातील मंत्र्याने केला दावा

भोपाळ – पंतप्रधान मोदी हे कृष्ण आणि रामाप्रमाणेच साक्षात ईश्वराचे अवतार असून त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि सांस्कृतीक विनाश रोखण्यासाठी देशात अवतार घेतला आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशातील एक मंत्री कमल पटेल यांनी केले आहे.
हरडा येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. पंतप्रधान मोदी हेच भारताला विश्वगुरू बनवू शकतात. देशातील लोकांचे सर्वंकष कल्याण साधण्याचे काम कोणताहीं सामान्य माणूस करू शकत नाही त्यासाठी ईश्वरी अवतार असलेल्या मोदींसारख्या व्यक्तीच हे काम करू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की आपल्या धर्मातही असे म्हटले आहे की जेव्हा केव्हा भारताच्या भुमीवर अन्याय, अत्याचार, आणि अनागोंदीचे प्रमाण प्रचंड वाढते त्यावेळी ईश्वर मानवी अवतार घेतो आणि आणि तो अधर्माचा नाश करतो. रावणाचे अत्याचार वाढल्यानंतर त्याचा नाश करण्यासाठी व रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी रामाने अवतार घेतला होता, तसेच कृष्णानेही अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माचे राज्य प्रस्थापित केले, मोदींचे कार्यही तशाच स्वरूपाचे आहे आणि तेच प्रत्यक्ष ईश्वराचे स्वरूप आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे अत्याचार आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठीच मोदींचा ईश्वरी अवतार झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. याच मंत्र्याने गेल्या नोव्हेंबर महिन्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे अदिवासींसाठी देवासमान असलेले तंट्या भिल्ल यांचे अवतार असल्याचे म्हटले होते.





