पुणे जिल्हा : परप्रांतीयांचा डाटाच नाही ; शिरुरच्या पूर्व भागातील वास्तवता

गुन्हे वाढल्याने पोलिस चौकीची गरज
तेजस फडके
निमोणे : शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील निमोणे गावात (दि २९) सर्पदंशाने एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सर्पदंश झालेल्या मुलीच कुटुंब बिहार राज्यातून निमोणे गावात एका गुऱ्हाळावर मजुरी करण्यासाठी आल होत. निमोणे तसेच परिसरात अनेक ठिकाणी विटभट्या आणि गुऱ्हाळ असून याठिकाणी काम करणाऱ्या कोणत्याच कामगारांची माहिती निमोणे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
शिरुर – तांदळी रस्त्यावर निमोणे हे महत्वाचे गाव असून गावची लोकसंख्या अंदाजे दहा हजाराच्या आसपास आहे. निमोणे गावात जिल्हा बँक, स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, महावितरणचे सबस्टेशन आहे. दर बुधवारी गावात आठवडे बाजार भरतो. त्यामुळे या गावात कायम वर्दळ असते. गावाच्या पूर्व भागात पिंपळाची वाडी येथे अंदाजे १५ ते २० विटभट्या असून काही गुऱ्हाळ आहेत. या विटभट्या तसेच गुऱ्हाळावर काम करणारे मजुर हे परप्रांतीय किंवा राज्याच्या विविध भागातून आलेले आहेत. परंतु गावातील विटभट्या व गुऱ्हाळावरील मजुरांची ग्रामपंचायतकडे कोणतीही नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे या मजुरांपैकी एखाद्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला तर त्यांना शोधणार कुठं हा मोठा यक्षप्रश्न आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलेल आहे.
निमोणे येथे गंभीर गुन्ह्यांची नोंद
निमोणे येथे साधारण दोन वर्षांपूर्वी बाहेरुन गावात पाहुणा म्हणून आलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आला होता. आजपर्यंत पोलिसांना या घटनेतील आरोपीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे बाहेरुन गावात उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या मजुरांचे पोलीस व्हेरीफिकेशन करण गरजेचे असताना ग्रामपंचायत त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
गावात चारही बाजुने अतिक्रमण
निमोणे गावात प्रचंड मोठया प्रमाणात गायरान जमीन उपलब्ध असून गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच त्या गायरान जमिनीत मोठया प्रमाणात अतिक्रमण करत जमिनीचा ताबा घेतला आहे. तसेच गायरान जमिनीत अवैधरीत्या पत्र्याचे शेड तसेच पक्की घरे बांधून त्या ठिकाणी मोठया प्रमाणात गावठी दारु विक्री करण्यात येत असुनही ग्रामपंचायत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
मजुरांना ना सुविधा ना विमा
विटभट्टी तसेच गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुरांना काही मालकांकडुन कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. काही मजुरांना शौचालय उपलब्ध नसल्याचे तर काहींना मोबाइलही नसल्याची माहिती मिळत आहे. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबातील व्यक्तींना गुऱ्हाळ मालकाने जबरदस्तीने त्यांच्या मूळ गावी पाठवून दिले असल्याचीही निमोणे परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. याबाबत गुऱ्हाळ मालकाला संपर्क साधला असता. त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
गुन्हाळ, वीटभट्टीमालकांना सूचना देणार
याबाबत निमोणे गावचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, निमोणे गावात मोठया प्रमाणात बाहेरच्या राज्यातून तसेच महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातुन मजुर कामाला आलेले आहेत. त्यांची कोणतीही माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. परंतु लवकरच आम्ही सर्व वीटभट्टी मालक आणि गुऱ्हाळ मालक यांना याबाबत बैठक घेऊन सूचना देणार आहोत.





