नव्या विषाणु प्रादुर्भावाबाबत मोदींनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेत करोनाचा ओमिक्रॉन हा नवीन विषाणू आढळून आला आहे. त्या विषाणुच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या धोक्याबाबत पंतप्रधान मोदींनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी संबंधीत तज्ज्ञांनी या नवीन विषाणुंची पंतप्रधानांना माहिती सादर केली.
आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध मागे घेण्याच्या निर्णयाचा संबंधीत अधिकाऱ्यांनी फेर आढावा घ्यावा अशी सुचना मोदींनी यावेळी केली.
या बैठकीच्या संबंधात प्रधानमंत्री कार्यालयातर्फे जे निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात नमूद करण्यात आले आहे की, नवीन विषाणुच्या गुणधर्मांबाबत तसेच त्याच्या प्रादुर्भावाच्या स्थितीबाबत यावेळी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. या विषाणुचा भारतात शिरकाव होण्याच्या शक्यतेबाबतही यावेळी चर्चा झाली.
या संबंधात भारतात आधीच योग्य ती काळजी घेण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्याची गरजही पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखवली.
मोदी म्हणाले की नव्या विषाणुच्या प्रादुर्भावाची चर्चा सुरू झाल्याने भारतातील विदेशी विमान सेवा पुर्ववत करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्यासंबंधात योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य सचिव राजेश भुषण, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आदि उपस्थित होते.





