पुणे जिल्हा : हुमनीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या जिव्हारी

ऊस उत्पादक हुमणीने त्रस्त : बारामतीच्या पश्चिम भागात विदारक स्थिती
उसासह बाजरी, आले पिकालाही फटका
विजय लकडे
सोमेश्वरनगर – नीरा खोऱ्यातील चारही धरणे तुडुंब भरल्याने शेतकरी खुश असला तरी बारामतीच्या पश्चिम भागामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने एक डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू येण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यातच आता उसाला हुमनीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. उभा ऊस हुमणीने खाल्ल्याने तो गुरांना घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, भागातील शेतकऱ्यांची ऊस, आले पीक, बाजरी ही पिके जागेवरच करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्चून लागवड केलेल्या उसासह खोडवा उसाला हुमणी लागल्याने येथील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. बारामती तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांना नीरा डावा कालव्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे. तरी शेतकऱ्यांचा उभा ऊस, बाजरी ही पिके वाळून का चालली आहेत, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. खताची मात्रा वेळेवर देऊन सुद्धा उसाची काळोखी तसेच जाडी काही वाढत नाही. परंतु उसामधील मोठी मोठी बेटे उन्मळून पडत आहेत. तीन महिन्यांपासून मुबलक ऊन पडल्याने हुमणी अळीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
हजारो रुपयाची मशागत, बियाणे, खत, मजुरी, औषध फवारणी असा लाखांचा खर्च करून सुद्धा लागवड केलेल्या उसासह, खोडवा ऊस, बाजरी, आले या पिकांना हुमणीने ग्रासले आहे. ही अळी पिकांच्या मुळाशी असते व मूळ कुरतडते. परिणामी मुळे कमी होऊन इतर भागात बुरशी तयार होते. त्यामुळे पिकांना लागणारे अन्नद्रव्य पुढे जात नाही. त्यामुळे शेतात असलेली उभी पिके पिवळी पडून वाळत जात आहे. निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी येथील काही शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
डिसेंबर महिन्यात तोड झालेल्या बिगर रोगी ऊसाला त्यावेळी चांगला उतारा मिळाला त्याच खोडव्याचे सध्या हाल चालले आहेत. आठ ते नऊ महिन्याच्या या खोडवा पिकाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उभ्या पिकात प्रत्येक ऊसाला हुमणी दिसून येत आहे. लागण केलेल्या उसालाही हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. महागडी औषधे वापरून सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही.
– मच्छिंद्र गोकुळ लकडे, ऊस उत्पादक शेतकरी.
वडगाव निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे म्हणाले की, हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते 10 जूनपर्यंत वळवाचा पाऊस ज्यावेळेस पडतो. त्यावेळेस शेतामध्ये हुमणी नियंत्रणासाठी हुमणी सापळे लावावे. जैविक कीड नियंत्रणासाठी मेटारायझम बुरशीचे दोन लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामधून आळवणी करावी किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचेकडील ईपीएन एक लिटर प्रति एकर प्रति 200 लिटर पाण्यामधून आळवणी करावी. ऊस पिकामध्ये फारच प्रादुर्भाव असल्यास फिप्रोनील 40%,+ इमिडाक्लोप्रिड 40% 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ऊस पिकामध्ये अळवणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





