‘मोदी सरकारमुळे नाही, तर काँग्रेसमुळेच तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण’, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचा दावा

Tahawwur Rana Extradition | 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने राणाची याचिका फेटाळल्याने त्याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर त्याला आज भारतात आणण्यात आले.
राणाला भारतात आणण्यात आल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत श्रेय लाटण्यासाठी सरकारची चढाओढ सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे मागील यूपीए सरकारचे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राणाला भारतात आणण्यात आल्यानंतर पी. चिदंबरम यांनी याबाबत एक पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर हुसेन राणा याला भारताकडे सोपवण्यात आल्याचा मला आनंद आहे. परंतु संपूर्ण माहिती सांगणे महत्त्वाचे आहे.
मोदी सरकार या घटनेचे श्रेय घेण्यासाठी मोठे दावे करत आहे. परंतु, हे हस्तांतर म्हणजे अमेरिकेशी समन्वय साधून यूपीए सरकारने केलेल्या आणि टिकवलेल्या दीड दशकाच्या कठोर, अथक आणि धोरणात्मक राजनैतिक कूटनीतीचे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
श्री पी. चिदंबरम (@PChidambaram_IN), सांसद एवं पूर्व केंद्रीय गृहमंत्री द्वारा जारी किया गया बयान प्रस्तुत है। pic.twitter.com/9G4sb7oBDj
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 10, 2025
पी. चिदंबरम यांच्यानुसार, तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठीचे प्रयत्न UPA सरकारने सुरू केले होते. याची सुरुवात 11 नोव्हेंबर 2009 रोजी झाली, जेव्हा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) डेव्हिड हेडलीविरुद्ध नवी दिल्ली येथे गुन्हा दाखल केला होता.
यूपीए सरकारच्या काळात झालेल्या अनेक प्रयत्नांचा उल्लेख करत चिदंबरम म्हणाले की, हा कोणताही मीडिया स्टंट नव्हता. तर शांत, दृढनिश्चयी, कायदेशीर मुत्सद्देगिरी होती. मोदी सरकारने ना ही प्रक्रिया सुरू केली आणि ना ही कोणतेही नवीन यश मिळवले. त्यांना केवळ यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेल्या परिपक्व, सुसंगत आणि धोरणात्मक मुत्सद्देगिरीचा लाभ मिळाला.
ते पुढे म्हणाले की, हे प्रत्यार्पण या गोष्टीचा पुरावा आहे की जेव्हा मुत्सद्देगिरी, कायदा अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारची बढाई मारल्याशिवाय अवलंबले जाते, तेव्हा भारत काय साध्य करू शकतो. यूपीए सरकारने वर्षानुवर्षे केलेले कठोर परिश्रम, शहाणपण आणि राजनैतिक दूरदृष्टीतून उभारलेल्या संस्थात्मक रचनेचा फायदा भाजप घेत असल्याची टीका चिदंबरम यांनी केली.





