दिलासा नाहीच ! २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडी वाढ

Tahavur Rana । दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील एनआयए स्पेशल कोर्टाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि आरोपी तहव्वूर राणा याच्या कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने राणाच्या न्यायालयीन कोठडी १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढ केली आहे. राणाची मागील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) राणाविरुद्ध गंभीर दहशतवादाच्या आरोपांची चौकशी करत आहे. एनआयएने तहव्वुर हुसेन राणाविरुद्ध पटियाला हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात राणाच्या भूमिकेबाबत नवीन तथ्ये आणि खुलासे उद्धृत करण्यात आले आहेत.
१३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी
पुरवणी आरोपपत्राच्या विचारासाठी न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. एनआयएच्या आरोपपत्रात राणाचा पाकिस्तानी सैन्य आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी गटांसोबत कटात सहभाग असल्याचे अधोरेखित केले आहे.
राणाने कुटुंबाशी बोलण्याची मागणी केली
तहव्वुर राणा यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, ज्यामध्ये त्यांनी नियमित अंतराने त्यांच्या कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी मागितली आहे. एनआयए न्यायालय १५ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी करेल.
चौकशीदरम्यान हुसेन राणाने अनेक मोठे खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाने या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थांचा सहभाग असल्याचे कबूल केले आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी तो मुंबईत उपस्थित होता आणि हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग होते, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
एनआयए कोठडीत चौकशी सुरूच Tahavur Rana ।
तहव्वुर राणा सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे. २६/११ च्या हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याला चौकशीला सामोरे जावे लागत आहे, ज्यामध्ये १६६ लोक मारले गेले होते आणि शेकडो जखमी झाले होते.
पाक सैन्याचा ‘विश्वासू एजंट’ म्हणून कबुली Tahavur Rana ।
मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीदरम्यान राणाने स्वतःला पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट असल्याचे सांगितले आहे. त्याने सांगितले की हल्ल्याच्या वेळी तो स्वतः मुंबईत उपस्थित होता आणि तिथे त्याची उपस्थिती हल्ल्याच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता.
राणाने लष्कर-ए-तैयबाकडून प्रशिक्षण घेतल्याचेही कबूल केले आहे. त्याने सांगितले की त्याने अमेरिकेत तुरुंगात असलेल्या दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीकडून पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. दोघेही दहशतवादी छावण्यांमध्ये एकत्र गेले होते आणि मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात एकत्र काम केले होते.





