Tahawwur Rana : तहव्वुर राणाच्या ‘त्या’ याचिकेला एनआयएकडून विरोध

नवी दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी दिल्यास महत्त्वाची माहिती लीक होऊ शकते. तसेच हा विषय अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असे म्हणत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने बुधवारी राणाच्या याचिकेला विरोध दर्शविला आहे.
विशेष एनआयए न्यायालयात तहव्वुर राणाने कुटुंबियांशी बोलण्याचा अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. एनआयएने आज झालेल्या सुनावणीत युक्तीवाद केला की, दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा भाग म्हणून आरोपी डेव्हिड हेडलीचा भारत दौरा करण्यापूर्वी राणा याच्याशी त्याने संपूर्ण ऑपरेशनची चर्चा केली होती.
हेडलीने राणाला त्यांच्या वस्तू आणि मालमत्तेची माहिती देणारा ईमेल पाठवला, असे एनआयएने न्यायालयात सांगितले. तसेच हेडलीने राणाला या प्रकरणात आरोपी असलेले पाकिस्तानी नागरिक इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान यांचाही या कटात सहभाग असल्याची माहिती दिली, असा दावा केला. दरम्यान, विशेष एनआयए न्यायालयाने १० एप्रिल रोजी राणाला १८ दिवसांच्या कोठडीत पाठवले होते.





