Farmer Protest | बच्चू कडू संतापले,’मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं..’

Farmer Protest | शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला ‘दिल्ली मार्च’ची घोषणा केली होती. त्यामुळे हरियाणा-पंजाब सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाच्या घटना समोर आल्या. हरियाणातील शंभू बॉर्डर आणि जिंद बॉर्डरवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आले.
एकीकडे पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्याने शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या आंदोलनाचा परिणाम उत्तर प्रदेशातील दिल्लीच्या सीमावर्ती शहर नोएडामध्येही दिसून आला. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार केल्यावरून सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याच मुद्यावर शिंदे सरकारमधील मित्र पक्ष असलेले महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनीदेखील शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला.
बच्चू कडू म्हणाले,’शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. पिकांना हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी देत आहे. मग ते पिकांना हमीभाव देण्याची गॅरंटी का देत नाहीत. सरकारने पिकांना हमीभाव दिला पाहिजे. सरकार नोकरदारांना सातवा, आठवा वेतन आयोग लागू करतं. सरकार नोकरदारांच्या पगारांची हमी देतं. मग शेतकऱ्यांच्या पिकांना का देत नाही? म्हणून मला असं वाटतं की हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे’ त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
हेही वाचा
sharad pawar। ‘शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलीगीकरण होणार नाही’ – प्रशांत जगताप





