कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी तज्ज्ञच सापडेना

अंजली खमितकर
पुणे – कुणबी आरक्षण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु सन 1940 ते 70 च्या दशकातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी तज्ज्ञच सापडेना, अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. तज्ज्ञ शोधून देण्यासाठी राज्याने पुराभिलेख संचालनालयाकडून तज्ज्ञांची यादी घेतली असली तरी त्यांनी निवडलेल्या प्रमाणपत्रधारकांना तज्ज्ञ म्हणावे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तालुका स्तरावर सन 1948 पूर्वीची आणि 1948 ते 1967 या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. बहुतेक नोंदी मोडी लिपित असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात आले आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. पुराभिलेख संचालनालयाकडून 70 जणांची यासाठी यादी देण्यात आली. ज्या व्यक्तींचा मोडी लिपी शिकण्याचा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र कोर्स झाला आहे. त्यांना अधिकृत समजून संचालनालयाने त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे.
मोडी लिपी शिकण्याचे जे वर्ग आजपर्यंत झाले आहेत, त्यामध्ये शेकड्यांनी सहभाग घेऊन प्रमाणपत्र घेतले आहे. (पुराभिलेख संचालनालयानेही मध्यंतरी नारायणगाव येथे मोडी प्रशिक्षण वर्ग घेतला होता) परंतु त्यातील कितीजण यामध्ये पुढे जाऊन कार्यरत झाले आहेत किंवा तज्ज्ञांच्या, अनुभवींच्या हाताखाली सराव करून मोडीचे कागद वाचण्यात “तज्ज्ञ’झाले आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ पंधरा दिवस-महिन्यांचा कोर्स करून प्रमाणपत्र घेऊन त्यांना “मोडीतज्ज्ञ’ म्हणावे का हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या जे मोडीतज्ज्ञ आहेत आणि जे संशोधनात कार्यरत आहेत. त्यांना अक्षरश: कमी मोबदल्यात मोडीतील नोंदी वाचण्यासाठी बोलावले जात आहे. ग्रामीण भागात तर मोडी वाचणारे समजतच नसल्याने तेथील नागरिक आता मुंबई, पुण्याकडे चौकशीसाठी धाव घेऊ लागले आहेत. ही एक बाजू असली तरी दुसरीकडे एखादा खरोखरच मोडीलिपीचा जाणकार आणि वाचणारा आहे; परंतु त्याच्याकडे मोडी शिकल्याचे प्रमाणपत्र नाही, असेही काहीजण ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे अनुभव महत्त्वाचा की प्रमाणपत्र हा देखील विषय महत्त्वाचा आहे.
मानधन देण्याची मानसिकता नाही
नुकत्याच शिकलेल्यांना जर ते हे काम देत असतील तर अवघड आहे. केवळ शिकून उपयोग नाही सराव हवा, असे मोडीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक पान वाचण्यासाठी पन्नास रुपये असे तुटपुंजे मानधन ठरवले जाते. सरकारची या मोडीतज्ज्ञांना योग्य मानधन देण्याची तयारीच नाही, हे यावरून दिसून येते, अशी खंत तज्ज्ञांनी व्यक्त केली.
“मोडी वाचणारे लोक खूप कमी आहेत. एक्स्पर्ट तयार होत नाहीत. मी 2008 पासून शिकवत आहे; परंतु तज्ज्ञ तयार होत नाहीत. यासाठी सरकारने राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे किंवा शालेय स्तरावर ती शिकवणे हाती घेतले पाहिजे. भलेही त्या विद्यार्थ्याला गुण देऊ नका, किंवा त्या गुणांवर पास-नापास ठरवू नका, परंतु ते शिकवा. विविध कलाकौशल्य-गुण या “कॅटॅगरी’मध्ये ते ठेवा. ही “आयडिया’ चांगली असली तरी पण शाळांमध्येही शिकवणारे तज्ज्ञही मिळाले पाहिजेत हे देखील त्याबरोबर महत्त्वाचे आहे.” – मंदार लवाटे, मोडीतज्ज्ञ





