नवी दिल्ली : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर राज्य सरकारकडून शेतक-यांसाठी कोट्यवधींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात शेतक-यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यातच राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठीचा औपचारिक प्रस्ताव पाठवला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली. कृषी क्षेत्रावर चर्चा सुरू असताना सभागृहात शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही, असे सभागृहात सांगितले. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर, ठाकरेसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून औपचारिक निवेदन मिळणे आवश्यक आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. मात्र, पाहणी होऊनही राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव अद्याप केंद्राला प्राप्त झालेला नाही. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शेतकरी संघटना, विरोधी पक्ष राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्र सरकारने आंतरमंत्रीय केंद्रीय पथक नियुक्त केले. या पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. राज्य सरकारकडून औपचारिक निवेदन अद्याप केंद्राला प्राप्त झाले नाही. हे निवेदन मिळाल्यानंतरच एनडीआरएफमधून अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. शेतक-यांना आवश्यक ती मदत – कृषिमंत्री भरणे राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतक-यांची कर्जवसुली करू नये असे आदेश दिले आहेत. शेतकरी संघटनेचे नेतेही त्या मीटिंगला हजर होते. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी परदेशी साहेबांच्या नावाची कमिटी राज्य सरकारने नेमली आहे. एप्रिलपर्यंत तिचा अहवाल येईल. ३ जूनपूर्वी राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे. राज्यात एक कोटी अडीच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना आवश्यक ती मदत केली आहे, अशी माहित राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.