Rajpal Yadav : नुकताच पार पडलेल्या स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र कार्यक्रमादरम्यान शोच्या निवेदकाने अभिनेता राजपाल यादव यांनी घेतलेल्या कर्जावर विनोद करत मस्करी केल्याने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावर चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त करत निवेदकाला ट्रोल केले. प्रकरण वाढत असतानाच स्वतः राजपाल यादव यांनी व्हिडिओ पोस्ट करून अत्यंत संयमित भूमिका मांडली. Rajpal Yadav Rajpal Yadav नेमकं काय घडलं? Rajpal Yadav कार्यक्रमादरम्यान निवेदकाने विनोदी अंदाजात म्हटलं, “डॉलर किंवा रुपया कितीही वर-खाली झाला तरी तुम्हाला तुमचं कर्ज फेडावंच लागेल.” हा संवाद थेट राजपाल यादव यांच्यावर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटली. काहींनी हा विनोद मानला, तर अनेकांनी तो वैयक्तिक आणि अपमानास्पद असल्याची टीका केली. राजपाल यादवची प्रतिक्रिया: वाद वाढत असताना राजपाल यादव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी म्हटलं: “जगात युद्ध, अर्थव्यवस्था आणि अनेक बदल सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्क्रिप्ट लिहिली जाते. पण कधी कधी ती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचत नाही. जाकिर खान आणि सौरभ द्विवेदी यांना दुखावू नका. दोघेही माझ्या लहान भावांसारखे आहेत.” राजपाल यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणावरही वैयक्तिक टीका करू नये आणि या मुद्द्यावरून द्वेष पसरवू नये. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचं सोशल मीडियावर मोठं कौतुक झालं. सलमान खानचा ठाम पाठिंबा : या प्रकरणानंतर अभिनेता सलमान खान यांनीही राजपाल यादव यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी लिहिलं “राजपाल भाई, तुम्ही गेल्या ३० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहात. आम्ही सगळेच तुम्हाला वारंवार सिनेमात कास्ट करतो. तुमच्या कामाचा दर्जा पाहून तुम्हाला यापुढेही काम मिळतच राहील आणि याच डॉलर रेटवर मिळत राहील. हेच सत्य आहे. Rajpal Yadav तुमच्या कामाचा दर्जा आणि तुमची किंमत आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार कास्ट करतो. तुम्हाला भविष्यातही खूप काम मिळेल आणि ते चांगल्या मानधनावरच मिळेल, हेच वास्तव आहे. कधीकधी उत्साहाच्या भरात लोकांच्या तोंडून काही गोष्टी निघून जातात, पण तुम्ही तुमचे काम मनापासून करत राहा. डॉलर वर होवो किंवा खाली काय फरक पडतो? शेवटी व्यवहार तर भारतातच करायचा आहे.” कोण आहेत राजपाल यादव? राजपाल यादव हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आणि लखनऊमधील भारतेंदू नाट्य अकादमी येथे अभिनयाचे शिक्षण घेतले. 1990 च्या दशकाच्या शेवटी त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘हंगामा’, ‘चुप चुप के’, ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. छोट्या भूमिकांनाही लक्षात राहतील असं सादरीकरण करणं ही त्यांची खासियत मानली जाते. विनोदी अभिनेता असला तरी भावनिक आणि गंभीर भूमिका देखील त्यांनी प्रभावीपणे साकारल्या आहेत. त्यांच्या साधेपणामुळे आणि मेहनतीमुळे इंडस्ट्रीत त्यांना विशेष आदर मिळतो. Rajpal Yadav सोशल मीडियावर समर्थनाची लाट : दरम्यान या घटनेनंतर अनेक चाहत्यांनी राजपाल यादव यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी विनोद करताना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवू नये, अशी मागणी केली. राजपाल यादव यांनी मात्र संयम दाखवत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मक संदेश दिला हीच गोष्ट चाहत्यांच्या मनाला भावली. स्क्रीन अवॉर्ड्समधील एका विनोदामुळे निर्माण झालेला वाद मोठा झाला असला, तरी राजपाल यादव यांच्या शांत आणि परिपक्व प्रतिक्रियेमुळे वातावरण निवळताना दिसत आहे. कलाकार म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही त्यांनी दाखवलेली समजूतदार भूमिका अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.