Mock Exercise: विमानतळावर सायरन वाजले.., बॅगेत बॉम्ब…
Mock Exercise:

बॉम्ब थ्रेट मॉक एक्सरसाइज सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
Mock Exercise: लोहगाव येथील पुणे विमानतळावर शनिवारी (दि. २४) सकाळी अचानक सायरन वाजले. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला.
एका बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या या थरारामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा घातपाताचा प्रयत्न नसून सुरक्षा यंत्रणांची आपत्कालीन सज्जता आणि समन्वय तपासण्यासाठी घेतलेला बॉम्ब थ्रेट मॉक एक्सरसाइज (सराव) होता, हे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि इतर भागीदार यंत्रणांच्या वतीने पुणे विमानतळावर वार्षिक आपत्कालीन सुरक्षा सराव (मॉक ड्रिल) पार पडला. विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटकाळात यंत्रणा किती वेगाने आणि समन्वयाने काम करतात, याची चाचपणी यावेळी करण्यात आली.
सकाळी ११:०० वाजता प्रशासकीय इमारतीत टेबलटॉप बैठकीने या सरावाची पूर्वतयारी झाली. त्यानंतर ठीक ११:३० वाजता टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रत्यक्ष थरार सुरू झाला. विमानतळाच्या चेक-इन भागात एक संशयास्पद बेवारस बॅग असल्याची माहिती इंडिगोच्या व्यवस्थापकांनी सीआयएसएफ नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने तात्काळ क्विक रिॲक्शन टीमला पाचारण केले.
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रभावित भागातील प्रवासी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून तो परिसर सील करण्यात आला. या मोहिमेत भारतीय वायुसेना, पुणे पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
तपासणीदरम्यान बॅगमध्ये बनावट आयईडी असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीच्या तातडीच्या बैठकीनंतर, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) टेलिस्कोपिक मॅनिपुलेटरच्या साहाय्याने ती संशयित बॅग सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवून विल्हेवाट क्षेत्रात रवाना केली. याच धर्तीवर कार्गो परिसरात ठेवलेला दुसरा बनावट बॉम्बही राज्य बीडीडीएस पथकाने यशस्वीरीत्या शोधून काढला.





