गुंड नीलेश घायवळच्या साथीदारांवर “मोक्का’

पुणे – कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराइतांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
मयूर उर्फ राकेश कुंबरे (27), गणेश राऊत (23), ओंकार उर्फ चिंक्या फाटक (23, तिघे रा. शास्त्रीनगर), मनीष रामकृष्ण माथवड (23, रा. गणंजय सोसायटी, कोथरूड), समीर खेंगरे तसेच तुषार उर्फ पोळेकर अशी कारवाई केलेल्या सराईतांची नावे आहेत.
कुंबरे याने कोथरूड तसेच पौड परिसरात दहशत पसरवली होती. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, दहशत पसरवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कुंबरे आणि साथीदारांवर मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 65 गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आल्याने गुंड टोळ्यांना जरब बसली आहे.




