Ketan Agrawal death case : मोबाईलमुळे उलगडला नवा धागा; प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री
Ketan Agrawal death case : आता या प्रकरणात एका तिसरे व्यक्तीचे नाव समोर आले आहे. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे.

Ketan Agrawal death case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, केतन अग्रवालच्या हत्येपूर्वीच त्याची नियोजित पत्नी सिया गोयलबाबत संशय आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनची हत्या त्याची नियोजित वधू सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी कट रचून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया आणि चेतन यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात एका तिसरे व्यक्तीचे नाव समोर आले आहे. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे.
या प्रकरणात नीरज कुमार नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तो या कटात सहभागी होता की केवळ साक्षीदार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, घटनेच्या दिवशी चेतन चौधरीने वापरलेला मोबाईल फोन त्याच्या नावावर नव्हता. हा फोन नीरज कुमारच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. नीरज हा चेतनच्या हाताखाली काम करत असल्याची माहिती असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर केतनने अनेकदा सियाच्या वागणुकीबाबत कुटुंबीयांकडे शंका व्यक्त केली होती. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, केतनने एकदा थेट विचारले होते, “तुम्ही सियाबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे का?” मात्र हे स्थळ नातेवाईकांच्या ओळखीतून आल्याने तिच्याबाबत पूर्ण खात्री असल्याचे कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितलं.
हेही वाचा : Heart Rate: हार्ट बीट वाढली म्हणजे हार्ट अटॅकच? तज्ज्ञांनी सांगितले खरे कारण
याशिवाय, १४ जूननंतर केतनने पुन्हा एकदा सियाच्या वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली होती. तिचा फोन अनेकदा व्यस्त लागत असल्याचा आणि ती वारंवार चेतन चौधरीचा उल्लेख करत असल्याचे त्याने सांगितले होते. सियाचे अन्य कोणाशी प्रेमसंबंध असावेत, अशी शक्यताही त्याने व्यक्त केली होती. मात्र, ती नात्यातील मुलगी असल्याने गैरसमज करून घेऊ नको, असे सांगत कुटुंबीयांनी त्याची समजूत काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सियाच्या वडिलांची तब्येत खालावली
आता या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींच्या चौकशीच्या आधारे पोलिस तपास अधिक वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर सियाच्या वडिलांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. मुलीच्या अटकेनंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला असून गंभीर प्रकृतीमुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
सियाचे इतरही मुलांसोबत अश्लील चॅटिंग : केतनच्या वडिलांचा गंभीर आरोप
चेतन चौधरीचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आहे. मागील साडेपाच महिन्यात तब्बल २००४ फोन कॉल आणि २३८ तास गप्पा झाल्याची माहिती समोर आली आहे. केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सियाला हे लग्न करायचेच नव्हते. शिवाय तिचे चेतनसोबत संबंध होते. यासह तिचं इतर अनेक मुलांसोबत अश्लील संभाषण आणि संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.






