खिशातील मोबाईलचा स्फोट, शिक्षकाचा जागीच मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना, मोबाईल कोणत्या कंपनीचा?
Updated On:

भंडारा – खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या शेजारी बसलेला वृद्ध व्यक्ती जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरेश संग्रामे (रा. सिरेगावटोला, ता. साकोली, जि. भंडारा) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव येथे एका नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाताना ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्फोटानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संग्रामे यांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर जखमीवर उपचार सुरु आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.





