Parinay Fuke : ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून आमदार परिणय फुकेंनी मागितली माफी

भंडारा : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी शिंदेसेनेबाबत काही दिवसांपुर्वी वादग्रस्त विधान केले होते. पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना ‘शिवसेनेचा बाप मीच आहे’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली. आमदार परिणय फुके यांनी माफी मागण्याची आक्रमक भूमिका शिंदेसेनेने घेतली. अखेर हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच आमदार परिणय फुके यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागून या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.
आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे सेना भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातूनच महायुतीतील घटक पक्षामुळेच आपल्या उमेदवारांना पराभवाला समोर जावे लागले असा आरोपही शिंदे सेनेने केला होता.
याबरोबरीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वबळावर लढण्याचा इशाराही शिंदेसेनेने दिला होता. त्यावरून कोणतीही वाईट गोष्ट घडली की त्याचे खापर आपल्यावरच फोडले जाते, जणू काही मीच शिवसेनेचा बाप आहे असे वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी केले होते. या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत माफीची मागणी केली होती. या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची भूमिका मांडली होती. आमदार फुके यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याची फडणवीस यांनी सारवासारव करताच महायुतीत वाद चिघळणार अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र, आज आमदार परिणय फुके यांनी शिंदे सेनेची माफी मागितली व वादावर पडदा टाकला.





