Parinay Fuke : भंडाऱ्यात एक नेता कमिशनखोरी करतो; परिणय फुके यांचा आरोप

भंडारा : भंडाऱ्यातील एक नेता 20 टक्के कमिशनखोरी करतो, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू परिणय फुके यांनी केला आहे. आपल्या आरोपांमध्ये २० कोटींच्या नियमबाह्य कामाची यादीही पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपवली होती, त्यानंतर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे भंडाऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत कमिशन खोरीच्या या प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश दिल्याचा फुकेंचा दावा आहे.
पुढील ७ दिवसात चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी होईल असे ते आपल्या आरोपांवर ठाम राहत म्हणाले आहेत. ते म्हणाले की, भंडाऱ्यातील एक नेता सरकारी विकास कामातून २० टक्के कमिशन खातो. त्या नेत्याने नातेवाईकांची बोगस कंपनी उभारून कोट्यवधीचे काम लाटले आहे. भंडारा आणि पवनी नगरपरिषदमधील सर्व कामे त्याच कंपनीला मिळवून दिले जाते आणि पुढे ती कंपनी छोट्या कंत्राटदारांना छोटे छोटे काम वाटून कमिशनखोरी करते.
दरम्यान, तो नेता कोण हे सांगायला मात्र फुके सध्या तयार नाहीत. जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीनंतर सर्वकाही बाहेर येईल, असा दावा फुकेंनी केला आहे. याच मुद्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत परिणय फुके यांनी भंडारा सीओबद्दल चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यात तथ्य आहे. विना मान्यता कामे दिले होते ते प्रकरण पुढे आणल्याचे म्हटले आहे.





