ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान मनसेला धक्का; एकनाथ शिंदेंनी पक्षाचा एकमेव नगरसेवकही फोडला!

Sanjay Turde : गेल्या काही दिवसांपासून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना रंगल्या आहेत. मात्र, दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली आहे. तुर्डे हे आपल्या हाती धनुष्यबाण घेणार असून शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळाले आहे. तसेच संजय तुर्डे यांच्या सोबत मनसेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माध्यमांशी बोलताना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र येण्याच्या चर्चांवर थेट बातमीच देतो असे सूचक विधान केले होते. अशातच राज ठाकरेंच्या माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी संजय तुर्डे हे देखील होते. त्यातील माजी नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र संजय तुर्डे यांनी मनसेत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता.





