MNS News : मनसेमध्ये उभी फूट? नेत्यांचा थेट राज ठाकरेंना इशारा
रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) सध्या (MNS News) अंतर्गत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहे.

MNS News : रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) सध्या (MNS News) अंतर्गत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहे. रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील जुन्या आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या अंतर्गत वादाचे पहिले मोठे पडसाद उमटले असून, माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट पक्षाकडे (MNS News) सुपूर्द केला आहे. जितेंद्र पाटील यांच्या या पावलामुळे मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केवळ पाटीलच नव्हे, तर माजी उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांच्यासह इतरही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि पक्षांतर्गत पसरलेल्या नाराजीवर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी समन्वयाची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते सध्या नाराज आहेत, त्यांच्या मी प्रत्यक्ष गाठीभेटी घेणार आहे. त्यांची मने जिंकून आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही नाराजी दूर करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर जी मोठी जबाबदारी सोपवली आहे, ती मी अत्यंत एकनिष्ठपणे पार पाडणार असून, रायगड जिल्ह्यात मनसेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या नियुक्तीचे समर्थन करताना बाळा म्हात्रे यांनी सांगितले की, मी जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आपण प्रत्येक लहान-मोठ्या पदाधिकाऱ्याशी (MNS News) फोन आणि व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून थेट संपर्क साधला असून संवाद सुरू केला आहे. लोकशाहीच्या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा आणि नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मवाळ भूमिका घेत असतानाच बाळा म्हात्रे यांनी नाराज गटाला एक अप्रत्यक्ष पण अत्यंत कडक इशाराही दिला आहे. ज्यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल आदर आहे, ते नक्कीच पक्षात राहून काम करतील; मात्र ज्यांना आदर नाही, ते पक्षात राहणार नाहीत, असे सूचक वक्तव्य म्हात्रे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण परिस्थितीची आणि रायगडमधील संघटनात्मक घडामोडींची माहिती देण्यासाठी आपण लवकरच मुंबईत जाऊन मनसे (MNS News) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान रायगडमधील पक्षबांधणी आणि सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
नाराजीचा फटका बसणार?
रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांच्या निवडीमुळे निर्माण झालेली ही अंतर्गत गटबाजी आता मनसेसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे, ही नाराजी वेळीच दूर करण्याचे आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे फार मोठे आव्हान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसमोर ठाकले आहे.
रायगड जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुका किंवा राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर जर हा अंतर्गत वाद वेळेत मिटला नाही, तर पक्षाला निवडणुकीत याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे रायगड मनसेतील हे नाराजीचे सत्र आता बाळा म्हात्रेंच्या समजूतदारपणामुळे मिटणार की येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होऊन पक्षाला खिंडार पडणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष लागले आहे.






