Pune District : जिल्हा परिषदेच्या राजगडमधील सर्व जागांवर मनसेचे लक्ष

विंझर : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राजगड (वेल्हे) तालुक्यातील सर्व सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष (आप्पा) दसवडकर यांनी केली आहे. या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणात मनसेने पूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत.
या संदर्भात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण चर्चा झाली, ज्यात सर्व जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष संतोष (आप्पा) दसवडकर म्हणाले, “मनसेने गेल्या काही वर्षांत राजगड तालुक्यातील जनतेचे प्रश्न सातत्याने व आक्रमकपणे मांडले आहेत. रस्ते, पाणी, वीज, पर्यटन, बेरोजगारी, स्थलांतर आणि विकास कामांमधील अन्यायाविरोधात मनसेने नेहमीच जनआंदोलने उभारली आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा पाठिंबा आता मनसेच्या पाठीशी अधिक दृढ झाला आहे.”
झपाट्याने वाढतेय मनसेची ताकद:
तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे यांनी सांगितले की, “राजगड तालुक्यात मनसेची ताकद झपाट्याने वाढत आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच जागांवर आमचे सक्षम उमेदवार उतरतील आणि मनसेला जनतेचा प्रचंड जनाधार मिळेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या बैठकीला जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्यासह तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, अंकुश दसवडकर, दत्ता चोरघे, दत्ता कदम, सतीश लिम्हण, माजी सरपंच विनायक लिम्हण, दत्ता शेंडकर, संतोष रेणुसे, अशोक चोरघे, माजी सरपंच अनिल देवगिरीकर, अमोल गायकवाड, विनायक उफाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या या निर्णयामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यात आगामी निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.





