‘मनसे’ विधानसभा रिंगणात; राजकारण फिरणार

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने याचे स्वागत जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे. मनसेचे उमेदवार विधानसभा रिंगणात उतरणार असल्याने लढती चुरशीच्या होणार आहेत. मनसेची राजकीय ताकद या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून येणार आहे.

लोकसभा निवडणूक मनसे लढविणार नसल्याचे तसेच भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर करतानाच पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी मनसे विधानसभा निवडणूक नक्की लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, लोकसभेला राज ठाकरे यांच्या “लाव रे तो व्हिडीओ’चा प्रभाव पडला नाही. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्याने मनसे तसेच ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्‍न चिन्हा निर्माण झाले होते. त्यानंतर ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांना सोबत घेत ईव्हीएम मशीनलाच विरोध करीत राज्यभर रान पेटविले होते. याच आंदोलनातून ते भाजपच्या “रडारवर’ आल्याचे बालले जात असतानाच ठाकरे यांना ईडीकडून चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली गेली. यातून मनसे आक्रमक झालेला असतानाच मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात मनसेची ताकद ठराविक मतदारसंघात असली तरी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची जाळ मनसेने सर्वत्र पसरलेले आहे. यामुळे मनसे नक्‍कीच वरचढ वाटणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना चांगली टक्‍कर देऊ शकतो, यामुळेच जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच मतदारसंघातील लढती आता चुरशीच्या होणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन झाल्यानंतर 2009 मध्ये 13 जागा जिंकत सत्तेला आव्हान देणारा पक्ष ठरला होता. परंतु, 2014 पर्यंत मनसे पक्षाची मोठी पिछेहाट झाली होती. त्यानंतरच्या काळात पक्ष वाढीकरीता झालेले दुर्लक्ष तसेच विरोधकांकडून करण्यात आलेली फोडाफोड याचाही फटका पक्षाला बसला. यासह परप्रांतीय, मराठी तसेच जुने मुद्दे घेऊनच मनसे आंदोलने करीत राहील्याने जनतेने मनसेला नाकारले परंतु, त्यानंतरच्या काळात मनसे पक्षाने बदल स्विकारत जनतेच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्‍नांना हात घातल्याने तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याने राज्यात मनसे अजूनही आव्हान निर्माण करू शकतो, असे चित्र निर्माण झाले होते.

राज्यातील 63 मतदारसंघात मनसेची ताकद चांगली असल्याचा दावा मनसेचे पदाधिकारी करीत आहेत तर पुणे जिल्ह्याचा विचार करता मनसेची ताकद अगदीच नगण्य असली तरी शहरांतर्गत मतदारसंघात मनसे निश्‍चित आव्हान निर्माण करू शकतो तसेच पुणे जिल्ह्यातील दहा मतदारसंघात राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षातून मोठ्या प्रमाणात “आऊट गोईंग’ झाले आहे.
यामुळे त्या पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. यामुळे त्या-त्या मतदारसंघात या पक्षांतून उमेदवारी मिळाली नाहीच तर मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छूक असतील, शिवाय मनसे आणि राष्ट्रवादीची चांगली जवळीक असल्याने राष्ट्रवादीतील बंडखोरांना शांत करण्याकरिता मनसे हा सर्वोत्तम पर्याय आघाडी समोर असल्यानेही मनसेला विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आव्हान देणारा उमेदवार मिळण्यास अडचणीचे ठरणार नाही.

…त्यानंतर उमेदवार जाहीर करणार
भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना युती आणि कॉंग्रेस बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी याबाबतचा निर्णय जो पर्यंत होत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार नाही, अशातच मनसे निवडणूक रिंगणात उतरत असल्याने अनेक जुन्या-नव्या इच्छुक उमेदवारांत उत्साह संचारला आहे. युती आणि आघाडीच्या निर्णयानंतरच मनसेकडून उमेदवारी जाहीर केली जाईल, असेही सांगितले जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×