मुंबई : मुंबई शहरातील मानखुर्दमधील ब्रीजवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला आमदाराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. एका दुचाकी चालकाने महिला ब्रीजवर चढली असून रडत असल्याची माहिती दिली असता ब्रीजवर पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत या महिलेस आत्महत्या करण्यावाचून रोखले.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचे नियोजन करत असताना एका दुचाकी चालकाने महिला ब्रीजवर चढली असून रडत असल्याची माहिती दिली. या घटनेबद्दल माहिती मिळताच वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.
पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिलेसोबत चर्चा करुन त्यांना समजावले त्यांना खाली उतरवत आत्महत्या करण्यावाचून रोखले. यावेळी या महिलेने आपण आमदाराची पत्नी असल्याची माहिती दिली असून कौटंबिक वादामुळे आपण तणावात असल्याचे सांगितले. दरम्यान या महिलेस नवी मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.