Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!
नेवासे विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील (Vitthal Langhe) यांनी थेट राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी धडक मारत दिवसभर अक्षरशः ठाण मांडले.

Vitthal Langhe : मंत्रालयातील दालनांमध्ये मंगळवारी दिवसभर एकाच आमदाराच्या धावपळीची आणि बैठकांच्या सत्रांची जोरदार चर्चा रंगली होती. नेवासे विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील (Vitthal Langhe) यांनी थेट राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी धडक मारत दिवसभर अक्षरशः ठाण मांडले. केवळ औपचारिकता न पाळता त्यांनी एकापाठोपाठ एक थेट पाच मंत्र्यांची दालने गाठून नेवासे तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रश्नांवर मंत्र्यांना बोलते केले.
आमदार लंघे-पाटील (Vitthal Langhe) यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी स्वतंत्रपणे आमनेसामने चर्चा केली.
आगामी २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही वर्षांवर येऊन ठेपलेला असताना शिंगणापूरसारख्या जागतिक देवस्थानाकडे जाणाऱ्या घोडेगाव-कुकाणा मार्गाची दुरवस्था आणि भाविकांच्या असुविधेचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे मांडला. या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण करून वाहनतळ व पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
दुसरीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विजेचा लपंडाव कायमचा संपवण्यासाठी त्यांनी ऊर्जा विभागाकडे ठोस कृती आराखडा सादर केला. घोडेगाव आणि सोनई येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांची तत्काळ दुरुस्ती करण्यासह तामसवाडी, रांजणगाव व खुपटी या भागात नवीन उपकेंद्रे उभारल्याशिवाय शेतीला सुरळीत वीज मिळणार नाही, हा वास्तववादी मुद्दा त्यांनी पटवून दिला.
याशिवाय तालुक्यातील पाणीटंचाईचा कायमस्वरूपी बीमोड करण्यासाठी गावोगावी नाले खोलीकरण व रुंदीकरणासाठी भरीव निधीची गरज त्यांनी अधोरेखित केली. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजने’मधील मुरूम, ग्रॅव्हलचे दर, वाहतूक खर्च आणि तांत्रिक निकषांमधील जाचक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना दर्जेदार बारमाही रस्ते देण्याची मागणीही या बैठकीत केंद्रस्थानी राहिली.
आमदारांनी मांडलेल्या या सर्व समस्यांवर पाचही मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक पवित्रा घेत लवकरात लवकर ठोस आदेश काढण्याचे आश्वासन दिले आहे. नेवासे तालुक्याचा कायापालट करणे हेच माझे अंतिम उद्दिष्ट असून जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत शासनस्तरावर असाच आक्रमक पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील (Vitthal Langhe) यांनी व्यक्त केला.






