सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे संपर्क अभियान गतिमान

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले संपर्क अभियान गतिमान केले आहे. सातारा शहरातील व्यापारी व येथील औद्योगिक एमआयडीसीच्या मास पदाधिकाऱ्यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेतली.
व्यापाऱ्यांचे प्रश्न समजावून घेत शिवेंद्रसिंह राजे यांनी मासच्या पदाधिकाऱ्यांना सातारा एमआयडीसीसाठी आपण विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
सातारा जिल्ह्यात निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू झाल्यापासून संभाव्य उमेदवारांनी गाठीभेटीचे सत्र सुरू केले आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने तिकीट निश्चित मानले जात असून पक्षश्रेष्ठींकडून त्याच्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सकाळी सातारा शहरातील खणआळी येथील आणि राजपथावरील बहुतांश व्यापाऱ्यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले.
विकसित साताऱ्यासाठी काय काय करता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली. बहुतांश व्यापाऱ्यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना आगामी लढतीसाठी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. सातारा एमआयडीसीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले.
काही दिवसापूर्वी सातारा शहरातील महाविद्यालयीन युवक व युवती यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेत त्यांनाही त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोडवणूक करण्याची आश्वासन दिले.





