सरकारचे मंत्री वाचाळवीर; आमदार शशिकांत शिंदे यांची टीका

कोरेगाव – केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे, याबद्दल शंका येते. भांडवलदारीचे समर्थन करणाऱ्या या सरकारचे मंत्री वाचाळवीर बनले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. भांडवलदारांचे समर्थन करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही एक देणे घेणे राहिलेले नाही.
सरकारमधील मंत्री वाचाळवीरासारखे बडबडत बसतात, त्यांना सर्वसामान्यांविषयी देणे घेणे राहिलेले नाही, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. वाचाळवीर मंत्र्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही, हे मोठे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे सरकारमध्ये कोणावरही कोणाचेही नियंत्रण राहिले नाही, अशी टीका देखील आमदार शिंदे यांनी केली.



