Satara : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या धोरणात लवकरच बदल करणार

कोरेगाव : पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका बाजूला पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तर एका बाजूला भरपूर पाण्यामुळे जमिनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ हा शासनाचा भाग आहे, त्यामुळे महामंडळाच्या धोरणांमध्ये बदल केला जात असून जास्तीत जास्त भाग सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये गुरुवारी दुपारी आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आवाज उठवला. मागील सरकारमध्ये जलसंपदा मंत्रिपद असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी धोम कालव्याच्या अस्तरीकरणासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. अधिवेशनामध्येच त्यांनी शब्द दिला होता. आम्ही आता हा विषय आश्वासन समितीकडे नेला आहे, असे त्यांनी सांगितले.
धरण प्रकल्पांसाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा कमी खर्च कालवा अस्तरीकरण करण्यासाठी येतो. कालवा अस्तरीकरण केल्यास एक दोन धरणातील जेवढे पाणी वाया जाईल, तेवढे पाणी वाया जाणार नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.





