Maharashtra Politics : ३ कोटी खर्च अन् १०० बोकडं; आमदार संजय गायकवाडांचा नवा पायंडा, सांगितला आगामी निवडणुकीचा प्लान

Maharashtra Politics : शिवसेना (शिंदे गट) चे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, या निवडणुका आता खर्चीक झाल्या असून, त्यासाठी ३ कोटी रुपये आणि १०० बोकडांचा खर्च येतो. यामुळे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याचा दावा त्यांनी केला.
यापूर्वी पावसाळी अधिवेशनात आमदार निवासाच्या कँटिनमध्ये जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गायकवाड चर्चेत आले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती. मात्र, गायकवाड यांची वादग्रस्त विधाने थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यांच्या या ताज्या विधानाने शिंदे गटाला पुन्हा अडचणीत आणले आहे.
गायकवाड पुढे म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होते, पण स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. काही ठिकाणी १-२ कोटी, तर काही ठिकाणी ३ कोटी रुपये खर्च होतात. १०० बोकडांचाही खर्च कार्यकर्त्यांना परवडत नाही.
त्यामुळे युतीचे धोरण चिखली, मलकापूर येथीलप्रमाणे बुलढाण्यातही ठरले, तर आम्ही युतीसाठी तयार आहोत. कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा.” या विधानामुळे स्थानिक पातळीवर गायकवाड यांच्यावर टीका होत असून, त्यांनी शिंदे यांच्या आदेशाला पुन्हा एकदा केराची टोपली दाखवल्याची चर्चा आहे.
याआधीही केलं होतं वादग्रस्त विधान
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशनात आमदार निवासाच्या कँटिनमध्ये जेवाणावरून गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला लाथा बुक्कयांनी मारलं. कुस्तीच्या आखाड्यासारखं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना एकनाथ शिंदेंकडून तंबी देण्यात आली होती. पण आमदार गायकवाड यांची वादग्रस्त विधाने काही थांबली नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेय.




