शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विकले स्वत:चे दोन प्लाॅट; 25 लाखांची मदत

बुलढाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी यंदा संवेदनशील पाऊल उचलत पूरग्रस्तांसाठी स्वतःचे दोन प्लॉट विकून २५ लाख रुपयांची रोख मदत जाहीर केली आहे. त्यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेतली आणि ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली.
यंदाच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान केले आहे. बुलढाणा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेली, राहेरा, नळकुंड, दाभा, तांडा, उबाळखेड, रोहिणखेड, खेडी, पान्हेरा, कोऱ्हाळा बाजार आणि बुलढाणा तालुक्यातील गिरडा, चौथा, पाडळी यासह अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडल्या गेल्या, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच पशुधनही वाहून गेले. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले असून, अनेक ठिकाणी शेतात मातीही शिल्लक राहिलेली नाही.
या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट विकून २५ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही रक्कम प्रत्यक्ष आणून दाखवली आणि दोन प्लॉटच्या विक्रीचा सौदा पूर्ण झाल्याचे सांगितले. ही रक्कम ते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करणार आहेत, जेणेकरून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्याचा योग्य वापर होईल.
संजय गायकवाड हे शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते तुलनेने शांत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईतील आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने ते देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या दमबाजी, टीका आणि तोल सुटलेल्या वक्तव्यांमुळे त्यांची ओळख वादग्रस्त आमदार अशीच आहे. मात्र, पूरग्रस्तांसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल त्यांच्या संवेदनशील बाजूचे दर्शन घडवणारे आहे.
या मदतीमुळे बुलढाणा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे. आमदार गायकवाड यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून, यामुळे इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





