Nagar | पारनेरचा आमदार शिवसेनेचाच होणार

पारनेर, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुक संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पारनेर तालुक्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच होणार असल्याचे म्हणत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या मतदारसंघात घडत असलेल्या सर्वच राजकीय घडामोडी ज्ञात आहेत.
त्यांचे बारीक लक्ष आपल्यावर आहे, त्यासाठी आपण सर्वांनी संपूर्ण ताकतीनिशी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन डॉ.श्रीकांत पठारे यांनी केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारनेर तालुक्यातील बूथ प्रमुखांसह निवडक कार्यकर्त्यांची बैठक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सुपा येथे आयोजित केली होती.
यावेळी डॉ.श्रीकांत पठारे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, ज्येष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख डॉ.कोमल भंडारी,
बाजार समिती संचालक बाबासाहेब नर्हे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख किसन चौधरी, उपनगराध्यक्ष राजू शेख, विभागप्रमुख बाबासाहेब रेपाळे, संतोष येवले, संतोष साबळे, दीपक मावळे, कामगारसेना प्रमुख डी.के.पांढरे यासह तालुक्यातील शिवसेनेचे सर्व बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत संबोधन केले. आपल्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचा खासदार झालेला असून आता विधानसभेला आपण कुठेही कमी पडायचे नाही. ज्येष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात सूचना केल्या व बूथ स्तरावर करावयाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.





