MLA Disqualification Case : कोण पात्र? कोण अपात्र? अंतिम निकाल कधी जाहीर होणार, वाचा…..

Shiv Sena MLA : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ अखेर आज संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत.
मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे अंतिम निकाल साधारण दुपारी चार वाजता देणार असल्याचं बोललं जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकारणाची चर्चा सुरु झाली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयात आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. त्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. साक्षीदार आणि पुरावे तपासले. त्यानंतर आज अंतिम निकाल समोर येणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर टांगती तलवार असल्याचं दिसून येत आहे.





