ABP CVoter ओपिनियन पोल: मिझोराममध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार?

ABP CVoter Opinion Poll 2023: निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) या वर्षाच्या अखेरीस मिझोराम विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. राज्यात 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, एबीपी न्यूज सी व्होटरने ओपिनियन पोल घेतला आहे.
ओपिनियन पोलनुसार, मिझोराममध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांच्या मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) एकूण 40 जागांपैकी 13 ते 17 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला 9 ते 13 जागा मिळू शकतात. याशिवाय एक ते तीन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
मागच्या वेळी कोणाला किती जागा मिळाल्या?
गेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने 40 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या तर झोराम पीपल्स मूव्हमेंटने आठ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबरला संपणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी (9 ऑक्टोबर) सांगितले की, मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 20 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 23 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.





