देवगिरीवर मित्र पक्षाच्या तक्रारींचा पाढा; अजित पवार यांच्यासमोर पराभूत उमेदवारांचा नाराजीचा सूर

मुंबई – लोकसभा निवडणूकीतील अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत जोरदार मुसंडी मारत यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 41 आमदार निवडून आले. मात्र, या निवडणुकीत त्यांचे काही उमेदवार पराभूत झाले. या पराभूत उमेदवारांची अजित पवारांनी शुक्रवारी देवगिरीवर बैठक बोलवली होती. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी आपल्याच मित्र पक्षाच्या तक्रारींचा पाढा वाचला.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून दिले. आता त्यांनी संघटनेकडे लक्ष दिले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक त्यांनी बोलावली होती. यावेळी यशवंत माने, देवेंद्र भुयार, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे, अतुल बेनके आणि राजेश पाटील हे पराभूत उमेदवार उपस्थित होते.
या बैठकीत पराभूत उमेदवारांनी यावेळी पराभवाचे खापर आपल्या मित्रपक्षांवर फोडले आहे. मित्र पक्षाने मदत न केल्यामुळेच आपला पराभव झाल्याचा सुर त्यांनी लावला. शिवाय भाजपनेही कोणतीही मदत केली नाही असा आरोपही या बैठकी करण्यात आला. भाजपच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आपला पराभव व्हावा यासाठीच प्रयत्न केले गेले की काय असा संशयही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
दरम्यान सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे अजित पवारांनी ऐकून घेतले. त्यानंतर पराभवाने खचून जावू नका. मी तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे. आता पूर्ण ताकदीने कामाला लागा. पुढच्या निवडणुकीत जिंकायचे आहे हे डोक्यात ठेवून आतापासूनच मैदानात उतरा, असेही ते म्हणाले. जी काही मदत लागेल ती सरकार आणि पक्ष म्हणून पुरवली जाईल, असे आश्वासनही यावेळी अजित पवारांनी सर्व पराभूत उमेदवारांना दिली आहे. शिवाय ज्यांनी मदत केली नाही त्यांची माहित संबधीत पक्षाच्या प्रमुखांना देवू असेही आश्वासन दिले आहे.





