Mitchell Starc : “भारत जगातील एकमेव देश, जो एकावेळी तीन संघ…”, मिचेल स्टार्ककडून भारतीय क्रिकेटचे कौतुक

Mitchell Starc praises Indian Cricket depth of talent : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या तरुण खेळाडूंची भरभराट आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही खेळाडूंना बराच काळ वाट पहावी लागते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारतीय क्रिकेटमधील प्रतिभेच्या खोलीचे कौतुक केले आणि म्हटले की हा एकमेव देश आहे, जो एकाच दिवशी तीन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये उतरवू शकतो.
मिचेल स्टार्ककडून भारतीय क्रिकेटचे कौतुक –
मिचेल स्टार्कने फॅनॅटिक्स टीव्ही या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “कदाचित भारत हा असा एकमेव देश आहे, जो एकाच दिवशी एक कसोटी संघ, एक वनडे संघ आणि एक टी-२० संघ मैदानात खेळण्यासाठी उतरवू शकतो. त्यामुळे भारत एकाच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय, आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामना खेळण्यासाठी आपला संघ मैदानात उतरवू शकतो.”
भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्येच खेळू शकतात
दरवर्षी आयपीएलच्या वाढत्या दर्जामुळे भारताला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फायदा मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर स्टार्क शोमध्ये देत होता. स्टार्क म्हणाला, “मला माहित नाही की, त्यात काही फायदा आहे की नाही, कारण क्रिकेटपटू म्हणून आपल्याला जगभरातील सर्व फ्रँचायझी (क्रिकेट) खेळण्याची संधी मिळते, परंतु भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्येच खेळू शकतात.”
वरुण चक्रवर्ती प्रतिभावान खेळाडू –
मिचेल स्टार्क पुढे म्हणाला, “अर्थातच, हे सर्व भारतीय क्रिकेटचे नंबर वन उत्पादन आहे. यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिभा असून जे टॉपवर आहेत. त्यामुळे आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे, यात शंका नाही.” वरुण चक्रवर्तीचे कौतुक करताना मिचेल स्टार्क म्हणाला, “त्याच्या विजयाने मला आश्चर्य वाटले नाही. मी संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली नाही. मी गेल्या हंगामात केकेआरमध्ये वरुण चक्रवर्तीसोबत खेळलो होतो आणि तो एक प्रचंड प्रतिभावान खेळाडू आहे.”





