IND vs AUS : दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू झाला दुखापतग्रस्त…

IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु त्याआधी मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे, सध्या त्याच्या जागी ‘ब्यू वेबस्टर’चा विचार केला जात आहे. पर्थ कसोटीदरम्यान मार्शला दुखापत झाली आणि मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्याच्या फिटनेसच्या समस्या वाढू लागल्या. इंग्लंड दौऱ्यापासूनच मार्शला या समस्येचा सामना करावा लागत असल्याचेही म्हटले जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना (रात्र-दिवस) ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. मार्शला दुखापतीमधून रिकव्हर होण्यासाठी वेळ आहे कारण ॲडलेड कसोटी सुरू होण्यासाठी अजून 8 ते 9 दिवस बाकी आहेत. वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि जर तो वेळेत बरा झाला नाही तर ब्यू वेबस्टरला ॲडलेड कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. वेबस्टर देशांतर्गत स्तरावर तस्मानिया संघासाठी खेळतो, ज्याच्या कर्णधाराने वेबस्टरला ‘विशेष खेळाडू’ अशी उपमा दिली आहे.
भारताला होणार फायदा…
रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही, मात्र दुसऱ्या कसोटीपूर्वी तो ऑस्ट्रेलियात आला आहे. रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार असून मिचेल मार्शची दुखापत टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण मार्शने पर्थ कसोटीच्या दोन्ही डावात 17 षटके टाकली आणि 3 महत्त्वाचे बळी घेतले. दरम्यान, दुसऱ्या डावात त्याने 47 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या.
ब्यू वेबस्टरबद्दल सांगायचे तर, त्याच्या प्रथम श्रेणीतील कारकिर्दीची आकडेवारी उत्कृष्ट आहे. आतापर्यंत 93 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 12 शतके आणि 24 अर्धशतकांसह 5,297 धावा केल्या आहेत. वेबस्टर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो आणि त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 148 बळी घेतले आहेत..





