आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात

सातारा -छत्रपती शिवरायांसंदर्भात टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे सातारा पोलीसांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून काही ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रकाशित होत असल्याने जातीय तणाव निर्माण होत आहे, अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ मेसेज प्रकाशित करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडियातून अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, कोणतीही शहानिशा न करता धार्मिक व जातीय तणाव होईल, लोकांच्या भावना दुखावतील असे मेसेज, फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नयेत. व्हॉट्सऍप व इंस्टाग्राम एडमिन यांनी असे मेसेज प्रसारित होऊ नयेत याची काळजी घ्यावी, नागरिकांनी जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पोलीसांनी नागरिकांना केले आहे.





