मंत्री विक्रमादित्य सिंग यांच्या ‘त्या’ विधानामुळे हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मोठा गदारोळ

शिमला : राज्याच्या सुरक्षेसाठी आपण बाहेरून येणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याच्या बाजूने अनुकुल आहोत. पण भाजपच्या विचारसरणीशी किंवा त्यांच्या कार्यशैलीशी सहमत नाही असे हिमाचल प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी राज्यातील रस्त्यावर विक्री करणाऱ्या खाद्य पदार्थांच्या विक्रेत्यांना त्यांची नावे प्रदर्शित करण्याच्या म्हणजेच आपली नावे जाहीर करण्याच्या संदर्भात घोषणा केल्यानंतर राज्यात वादंग सुरू झाले असताना प्रतिभा सिंह यांची टिप्पणी आली. विक्रमादित्य यांच्या या विधानाने हिमाचलचे राजकारण चांगलेच तापले.
दरम्यान, या संदर्भात पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेसच्या धोरणांच्या आणि विचारसरणीच्या विरोधात कोणालाही जाऊ दिले जात नाही. याच क्रमाने आज प्रतिभा सिंह यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे प्रभारी महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिभा सिंह म्हणाल्या की, हा मुद्दा प्रमाणाबाहेर वाढवून सांगितला जातो आहे. राज्याची अंतर्गत सुरक्षा पाहता हिमाचल प्रदेशला भेट देणाऱ्यांच्या यात्रेमागचा उद्देश जाणून घेण्यासाठी बाहेरील व्यक्तींची ओळख पटवली पाहिजे. पक्ष हायकमांडला लोकांच्या भावनांची जाणीव आहे.
विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रस्त्यावरील विक्रेत्यांना, विशेषत: खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना त्यांच्या दुकानात ओळखपत्रे दाखवणे बंधनकारक असल्याचे सांगून वाद निर्माण केला. यानंतर काँग्रेसच्या राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. कॉंग्रेसचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी गुरुवारी सांगितले की रस्त्यावर विक्रेत्यांना परवाने दिले जातील आणि त्यांचे नियमन केले जाईल जेणेकरून पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये. मालक म्हणून त्याचे नाव सांगणारा कोणताही फलक लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.





