“किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शाॅक दिल्याशिवाय…”

मुंबई – किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शाॅक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही, अशी जहरी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. जळगावात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
अन्वय नाईक प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले, सोमय्या हे बेताल बडबड करताहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून शाॅक दिल्याशिवाय त्यांची ही बडबड थांबणार नाही. त्यांनी रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. असे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून खासदार झाले आणि ते आज ठाकरे कुटुंबावरच टीका करताहेत. किरीट सोमय्या हे अत्यंत कृतघ्न आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले.
किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केलेले आरोप-
“ठाकरे सरकार हे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार आहे. मी यापूर्वी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. अल्पेश अजमेरा बिल्डरने 2 कोटी 55 लाखात घेतलेली जमीन मुंबई महापालिका 900 कोटी रूपयात विकत घेण्यासाठी निघालीय. त्यातील 354 कोटी याआधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.





