मंत्री आदित्य ठाकरेंनी पत्र पाठवून केंद्राकडे केल्या ‘या’ 3 महत्त्वाच्या मागण्या

मुंबई – राज्यातील मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. बूस्टर डोस देण्याची अनुमती द्या, दोन डोसमधील अंतर कमी करा आणि लसींसाठीची वयोमर्यादा 15 पर्यंत खाली आणा अशा त्यांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या आहेत.
करोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. त्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की या उपाययोजना केल्यास नागरिकांना नवीन विषाणूंपासून आपण संरक्षण देऊ शकतो.
करोना लसींच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे करावे, अशी महत्त्वाची सूचनाही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. जर असे केले तर जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत आपण जवळपास सर्वच नागरिकांना लसींचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. त्यासाठी लसींच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढवण्याची गरज नाही किंवा लसींच्या पुरवठ्याचे शेड्युल्डही बदलण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईत शंभर टक्के नागरीकांना या लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि 73 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आली आहे.





