हिजाब प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई – जर शाळेमध्ये गणवेश बंधनकारक असेल तर त्या ठिकाणी इतर कोणत्याही पोशाखाला जागा नसावी. त्या ठिकाणी शाळा वा महाविद्यालयं व्यवस्थापनेने सांगितलेला गणवेश बंधनकारक असावा. शाळा अथवा महाविद्यालयं ही शिक्षणाची केंद्र आहेत, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षणालाच स्थान आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना कोणतेही स्थान नसावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी देशातील राजकीय वातावरण तापले असताना आता यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळांमध्ये शाळेच्या गणवेशाच्या व्यतिरिक्त कोणताही गणवेश नसावा, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाबबंदीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहे. राज्यात काही ठिकाणी हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे.





