Mineral Water Bottle : LPG पाठोपाठ आता बाटलीबंद पाणी महागणार; तब्बल इतके पैसे जास्त मोजावे लागणार?
भारतामध्ये एप्रिल ते जून या कालावधीत बाटलीबंद पाण्याची मागणी सर्वाधिक असते. त्यामुळे या काळात उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्यांना दर वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

Mineral Water Bottle : इराणमधील युद्धजन्य तणावाचा परिणाम केवळ तेल बाजारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद आता भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही उमटू लागले आहेत.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे कंपन्या पाण्याच्या बाटल्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे देशात उन्हाळ्याचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच हा दबाव वाढू लागल्याने ग्राहकांना येत्या काळात महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्पादन खर्चात मोठी वाढ : Mineral Water Bottle
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार भारतातील सुमारे ५ अब्ज डॉलर्सच्या पॅकेज्ड वॉटर उद्योगावर युद्धामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीच्या समस्यांचा परिणाम होत आहे.
प्लास्टिकच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्स यांसारख्या पॅकेजिंग साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.
उद्योग संघटना ‘ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या माहितीनुसार देशातील सुमारे २,००० लहान उत्पादकांनी वितरकांसाठी प्रति बाटली सुमारे १ रुपयांनी दरवाढ केली आहे. म्हणजेच सुमारे ५ टक्के वाढ झाली आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार येत्या काही दिवसांत ही वाढ १० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
किरकोळ बाजारात अद्याप स्थिरता :Mineral Water Bottle
सध्या किरकोळ बाजारात मात्र मोठा बदल दिसून येत नाही. अनेक मोठ्या कंपन्या वाढलेला खर्च स्वतः उचलत आहेत, जेणेकरून ग्राहकांवर तात्काळ भार पडू नये. भारतात साधारणपणे १ लिटर बाटलीबंद पाण्याची किंमत २० रुपयांपेक्षा कमी असते. त्यामुळे दरवाढ झाल्यास तिचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. आणि ग्राहक तुटला जाऊ शकतो यामुळे स्वतः कंपन्या वाढलेला खर्च उचलत आहेत.
कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम : Mineral Water Bottle
उद्योगातील तज्ज्ञांच्या मते या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ. कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या पॉलिमरचा वापर प्लास्टिक बाटल्या बनवण्यासाठी होतो. सध्या प्लास्टिक बाटल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची किंमत जवळपास ५० टक्क्यांनी वाढून सुमारे १७० रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
तसेच, बाटल्यांच्या झाकणांची किंमत दुप्पटपेक्षा जास्त वाढून सुमारे ०.४५ रुपये प्रति तुकडा झाली आहे. कॉरुगेटेड बॉक्स, लेबल आणि चिकट टेप यांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.यामुळे एकूण उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.
भारतात बाटलीबंद पाण्याची वाढती गरज :
भारतामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अजूनही मोठे आव्हान आहे. अनेक अभ्यासांनुसार देशातील सुमारे ७० टक्के भूजल काही प्रमाणात प्रदूषित असल्याचे मानले जाते. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही बाटलीबंद पाण्यावर लोकांचे अवलंबित्व वाढत आहे.
रेल्वे स्थानके, बस स्थानके, पर्यटनस्थळे, कार्यालये आणि कार्यक्रमांमध्ये बाटलीबंद पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या उद्योगाचा विस्तार वेगाने होत आहे.
प्रीमियम पाण्याचा वाढता बाजार :
सामान्य पॅकेज्ड वॉटरसोबतच नैसर्गिक मिनरल वॉटरचा बाजारही झपाट्याने वाढत आहे. भारतातील प्रीमियम पाण्याचा बाजार सध्या सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
२०२१ मध्ये एकूण बाजारातील प्रीमियम पाण्याचा हिस्सा केवळ १ टक्का होता, तर गेल्या वर्षी तो ८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अरावली पर्वतरांगांमधून मिळणारे मिनरल वॉटर विकणारी Aava Water या कंपनीनेही आपल्या पुनर्विक्रेत्यांसाठी बाटल्यांच्या किंमती सुमारे १८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
कंपन्यांचा तात्पुरता तोल सांभाळण्याचा प्रयत्न :
उद्योग तज्ज्ञांच्या मते अनेक कंपन्या सध्या ४० ते ५० टक्के अतिरिक्त खर्च स्वतः उचलत आहेत, जेणेकरून ग्राहक गमावले जाणार नाहीत. मात्र कच्च्या मालाच्या किंमती वाढत राहिल्यास उन्हाळ्याच्या काळात बाटलीबंद पाण्याच्या किंमती वाढल्याचे ग्राहकांना स्पष्टपणे जाणवू शकते.
भारतामध्ये एप्रिल ते जून या कालावधीत बाटलीबंद पाण्याची मागणी सर्वाधिक असते. त्यामुळे या काळात उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्यांना दर वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.






