Milk Price Hike : सणासुदीच्या दिवसांत महागाईचा मोठा झटका.! दुधाच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
सणासुदीच्या तोंडावर मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर महागाईचा आणखी एक भार पडणार आहे.

Milk Price Hike : सणासुदीच्या तोंडावर घरगुती बजेटवर महागाईचा आणखी एक भार पडणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्याचा ९३ रुपये प्रतिलिटर असलेला घाऊक दर आता १०२ रुपये होणार आहे. हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहतील.
जोगेश्वरी येथे झालेल्या मुंबई दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, पशुखाद्य, चारा आणि पेंड यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काही पशुखाद्यांच्या दरात तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दरवाढ करावी लागल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
या दरवाढीचा परिणाम मुंबईतील दूध, चहा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि घरगुती खर्चावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना ही दरवाढ मुंबईकरांच्या बजेटवर अतिरिक्त भार टाकू शकते.
मात्र, ₹१०२ हा घाऊक दर आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या किरकोळ दरात किती वाढ होईल, हे विक्रेते आणि डेअरीनुसार वेगळे असू शकते. त्यामुळे प्रत्येक ब्रँडच्या पॅकेट दुधाचा दर ₹१०२ होईल, असे सरसकट म्हणता येणार नाही. मात्र, यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसल्याच दिसून येत आहे.






