Milk Adulteration: दूध भेसळप्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार; तपासाची गती का मंदावली? ‘बडे मासे’ वाचवण्याचा प्रयत्न?
Milk Adulteration: मंचरपासून दौंडपर्यंत पसरलेल्या दूध पुरवठा साखळीवर संशयाची सुई; संपूर्ण रॅकेटमधील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता असतानाही पोलिसांची पावले पडतात मागे.

Milk Adulteration – दौंड तालुक्यात उघडकीस आलेल्या गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणाला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंचर ते दौंड तालुक्यापर्यंत पसरलेल्या दूध पुरवठा साखळीशी धागेदोरे जोडले जात असल्याची चर्चा आहे. संपूर्ण रॅकेटमधील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
मात्र, तपासाची गती मंदावल्याने अधिकाऱ्यांना मुळाशी जात आले नसल्याची चर्चा आहे. दूध भेसळ प्रकरणात तपासाची नेमकी स्थिती काय, मुख्य आरोपी अद्याप फरार का आहे आणि तपास कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य आरोपीला अद्याप अटक का झाली नाही, तपासात नेमके कोणते अडथळे आहेत, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.
तपास यंत्रणांनी निष्पक्ष व सखोल तपास करून दूध भेसळ साखळीतील सर्व संबंधितांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दूधामध्ये पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च किंवा इतर रासायनिक पदार्थ मिसळून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपासाला गती देत मुख्य आरोपीस तातडीने अटक करावी, तसेच संपूर्ण रॅकेट उघडकीस आणावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, दूध भेसळ प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकारी व तपास यंत्रणांशी अनेकवेळा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही, तसेच पाठविण्यात आलेल्या संदेशांनाही कोणताही प्रतिसाद दिला नाही.





