Milk Adulteration: दूध भेसळ करणाऱ्यांची खैर नाही! राज्य सरकार राबवणार ‘विशेष मोहीम’; विधानसभेत मोठी घोषणा
Milk Adulteration: आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वेधले दुधातील भेसळीकडे लक्ष; बहुतांश दूध संकलन केंद्रांवर तपासणी सुविधेचा अभाव असल्याचा सभागृहात दावा.

Milk Adulteration – दुधातील भेसळीवर राज्य सरकार विशेष मोहीम राबविणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत केली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली. आमदार राहुल कुल यांनी सभागृहात सांगितले की, राज्यातील दुधातील भेसळीचा प्रश्नही गंभीर असून बहुतांश दूध संकलन केंद्रांवर तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र धोरण राबविण्यासह सदोष आढळलेल्या अन्नपदार्थांचे बॅच तातडीने बाजारातून मागे घेऊन संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे अत्याधुनिक अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
त्याचबरोबर पुणे, नाशिक, रायगड आणि यवतमाळ येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. पूर्वी अन्न नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळण्यास सुमारे तीन महिने लागत होते. मात्र, नव्या कार्यपद्धतीमुळे आता एका महिन्याच्या आत अहवाल उपलब्ध होत आहेत. पुढील महिन्यापासून हा कालावधी आणखी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सदोष आढळणाऱ्या कंपन्यांची नावे सभागृहाच्या पटलावर ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भेळ अन्न व दूध उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास आमदार कुल यांनी व्यक्त केला.




